तिसरे जागतिक महायुध्द झालेच तर ते पाण्यासाठी होणार असे भाकित काही जणांनी वर्तवले आहे. त्याला पुष्टी देणाऱ्या दोन घटना गेल्या महिन्यात घडल्या. एक हिंगोली जिल्ह्यातील. तेथे दोन गावांतील नागरिक पाण्यासाठी लाठ्याकाठ्या घेऊन मैदानात समोरासमोर उतरल्याची आणि दुसरी परभणी येथील. तेथे पालिकेच्या एका जलकुंभावर पाणीपुरवठा सभापती आणि विरोधी पक्षातील एका नगरसेविका यांच्यात झालेला वाद आणि "आधी आमच्याच प्रभागाला पाणी द्या', असा आग्रह धरणाऱ्या दोन्ही प्रभागांतील नागरिकांची. या दोन्ही घटना पाणीटंचाईशी संबंधित आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील एकांबे या गावात पाटाचे पाणी आधी कोणत्या गावाला द्यायचे यावरून वाद झाला आणि दोन्ही गावांतील ग्रामस्थ थेट लाठ्याकाठ्या घेऊनच मैदानात उतरले. अखेर प्रशासनाला ग्रामस्थांची समजूत घालावी लागली आणि हे प्रकरण तात्पुरते मिटले. तात्पुरते असे म्हणायचे ते यासाठी, की अशी परिस्थिती भविष्यात कधीही निर्माण होऊ शकते!
आता परभणीच्या घटनेबाबत. तेथे पालिकेने चक्राकार पध्दतीने चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय धाब्यावर बसवला तो लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या नगरसेवकांनीच. ज्या प्रभागाचा नगरसेवक जास्त "बलदंड'; त्या प्रभागाला नियमित आणि मुबलक पाणी आणि जेथे नगरसेवक बलहीन किंवा जो नगरसेवक "मला काय त्याचे?' अशी भूमिका घेऊन या प्रश्नाकडे पाहणारा; त्याच्या प्रभागात पाणीटंचाई. त्यामुळे अशा प्रभागांत पाणीटंचाईची नेहमीचीच बोंब. मात्र, त्यामुळे अशा प्रभागांतील नागरिकांच्या संतापाचा अखेर स्फोट झाला. हे नागरिक थेट जलकुंभावरच गेले आणि त्यांनी बळजबरीने व्हॉल्व्ह फिरवून पाणी आपल्या प्रभागाकडे वळवून घेतले. त्यातूनच पाणीपुरवठा समितीचे सभापती आणि या प्रभागाच्या नगरसेविका यांच्यात वाद झाला. बघताबघता दोन्ही प्रभागांतील हजारावर नागरिक जमा झाले आणि त्यांच्यात हमरातुमरी सुरू झाली. अखेर मुख्याधिकाऱ्यांना रात्री बारा ते दीड असा दीड तास जलकुंभावर काढावा लागला आणि सर्वांची समजूत काढावी लागली. त्यांच्या मध्यस्थीनंतरच हा वाद संपुष्टात आला.
गेल्या वर्षीचा आणखी एक प्रसंग आठवला. ही घटना आहे औरंगाबाद येथील. मे महिना. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले. त्यातच जलवाहिनी फुटल्याने चार दिवस निर्जळीची पालिकेची घोषणा. त्यामुळे ज्यांना पालिकेच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते त्यांची भटकंती सुरू. एका प्रभागातील महिलांचा जत्था पाण्याच्या शोधात हंडे घेऊन निघालेला. हा जत्था उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या एका भागात आला. तेथे एक कोट्यधीश महाशय चालकाकडून आपली आलिशान "होंडा सिटी' धुऊन घेत होते. या भागात मात्र पालिकेचा पाणीपुरवठा सुरू होता! चालकाने पाईप थेट नळाला लावलेला आणि मुबलक पाण्याचा वापर करत गाडीची स्वच्छता सुरू होती. गाडीच्या मालकाचे कधीतरी आपल्याकडे लक्ष जाईल आणि आपल्याला एखादा हंडाभर पाणी मिळेल, या आशेने महिलांचा हा जत्था तेथे घुटमळत होता. मात्र, मालक आणि चालक त्यांच्या कामांत मग्न. पाणी धो - धो वाहत होते तसतसा या जत्थ्यातील महिलांचा राग अनावर होत होता. अखेर त्यातील एक धीट महिला पुढे आली आणि तिने थेट मालकालाच "आम्हाला हंडाभर पाणी देता का?', अशी विचारणा केली. मालकाने ऐकून न ऐकल्यासारखे केले. चालकानेही मालकाचीच री ओढली. आता मात्र त्या महिलेच्या संयमाचा बांध फुटला. आधीच तासभर वणवण भटकंती झालेली, त्यात पुन्हा डोक्यावर ऊन आणि या मालकाचा हा असा आविर्भाव. काही कळण्याच्या आतच तिने खस्कन त्या चालकाच्या हातातील नळी ओढून घेतली आणि हंडा भरण्यास सुरुवातही केली. मालक आणि चालक दोघेही अवाक्. त्यांना काही बोलणेही शक्य झाले नाही. त्या जथ्यातील सर्व महिलांनी आपले हंडे - भांडी भरून घेतली आणि काहीही न बोलता आल्या दिशेने त्या रवाना झाल्या.
या तिन्ही घटना पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात आणून देणाऱ्या तशाच पाण्यासाठी यापुढे कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही, हे दर्शविणाऱ्या. आपल्या हक्काची गोष्ट मिळाली नाही तर ती कोणतेही मोल देऊन खेचून घेऊ, हे सांगणाऱ्या!
Sunday, May 16, 2010
Subscribe to:
Posts (Atom)